अधीक्षकाच्या घरात सापडली कोटींची माया

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यासह दोघांना सुरक्षा रक्कम परत देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता विशेष न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान , अधीक्षक अभियंता कांबळे यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून कोरे स्टॅम्प पेपर, सोन्याचे दागिने, लाखोंची रोकड, फ्लॅटची कागदपत्रे, शेतीची कागदपत्रे असे कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाले आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अरुण देवकर यांच्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या भीमा कालवा मंडळ सोलापूरचे अधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे (वय 53, रा. प्लॉट नं. 5, कोनार्कनगर, विजापूर रोड, सोलापूर) आणि चालक कैलास सोमा अवचारे (वय 30, रा. सावळेश्‍वर, ता. मोहोळ) या तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.