अवयवदान ही एक व्यापक चळवळ व्हावी : पोलीस उपायुक्त अशोक मोराळे

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

सचिन बडे

अवयवदाता दिनाचे औचित्य साधत रुबी हॉल क्लिनिक च्या वतीने स्मरण अवयवदात्यांचे या कार्यक्रमाचे आयोजन करत अवयवदाता दिन  बालगंधर्व रंगमदिर या ठिकाणी साजरा करण्यात आला.यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी अवयवदान ही एक व्यापक चळवळ व्हावी असे मत व्यक्त केले. अवयवदानाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नवीन जीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने अवयवदानासाठी समोर आले पाहिजे असे मोराळे म्हणाले.

या कार्यक्रम प्रंसगी सिनेअभिनेते अतुल परचुरे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, रुबी हॅालच्या अवयदान विभागाचे प्रमुख डाॅ. कपील झेरपे, डाॅ. जगदिश हेरमेण, डाॅ. अभय हुपरेकर, डाॅ. अभय सदरे, डाॅ.शितल धडफळे, आदी मान्यवरांसह मोठ्याप्रमाणावर अवयदाते व ज्यांना अवयवदानाने नवीन जीवन मिळाले आहे असे लोक उपस्थित होते.

सुरुवातीच्या काळात अवयवदान करण्यास नागरिक समोर येत नव्हते, मात्र आता अवयवदानात मोठ्याप्रमाणात जनजागृती होत असल्यामुळे अवयवदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ होत असल्याचे मत डाॅ. कपील झेरपे यांनी व्यक्त केले. तसेच 1997 ला जेव्हा आंम्ही अवयव प्रत्यारोपनाचा कार्यक्रमाला पुण्यात सुरूवात केली. तेव्हा लोकांचा प्रतिसाद अत्यंत कमी होता, मात्र सध्याच्या काळाचा विचार करता लोक अवयवदान करण्यासाठी समोर येत आहे.

अवयवदान हे समजाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे कार्य आहे. आजच्या कार्यक्रमाला येण्याअगोदर अवयवदाना विषयी फारशी  माहिती नव्हती. या कार्यक्रमाला आल्यानंतर मला माहिती झाले, की हे काम किती महान आहे. त्यामुळे आज मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत अवयवदानाची टक्केवारी ही 38 टक्के आहे. पण भारतात मात्र हेच प्रमाण 1.8 टक्के आहे त्यामुळे आपल्या देशात अवयवदानाबद्दल जनजागृती करणे गरजेचे असल्याचं मत सिनेअभिनेते अतुल परचुरे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी ज्या लोकांनी अवयवदान केले आहे व ज्यांना अवयवदानामुळे नवीन जीवन मिळाले आहे अशा लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या सर्व लोकांना रुबी हाॅल तर्फे सन्मानित करण्यात आले. अवयवदान ही एक जन चळवळ व्हावी ज्याच्या माध्यमातून भारतात अवयवदान मोठ्याप्रमाणावर होवून अनेक लोकांचे जीव वाचण्यास मदत होईल. यासाठी तरुणांनी पुढे येवून जनजागृती करणे गरजेचे आहे. आज शहरात जरी मोठ्याप्रमाणात अवयवदान होत, असले तरी ग्रामिण भागात हे प्रमाण अतिशय कमी आहे. अवयवदान केलेल्या अवयवांची एका शहरातून दुसऱ्या शहरात ने आण करण्यासाठी पोलीसांच्या वतीने अनेकदा ग्रीन काॅरिडाॅर तयार करुन देत असतो. पोलीसांच्या मदतीने हे अवयव अति जलद गतीने पोहचविण्यास मदत होते.

या कार्यक्रमाच्या अगोदर अवयवदाणाविषयी जनजागृती करण्यासाठी शनिवारवाडा ते बालगंधर्व रंगमंदिर अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून जनतेला अवयवदान करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.