‘आयसीसीआर’च्या माध्यमातून अभ्यास करणारे परदेशी विद्यार्थीच भारताचे खरे सांस्कृतिक दूत – राज्यपाल

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

भारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक संबंध वाढवणे, त्यांचे पुनरुज्जीवन करून त्याला बळकटी देणे हेच ‘आयसीसीआर’ अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या स्थापनेचे खरे उद्दीष्ट आहे. विविध देशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असून या संस्थेच्या माध्यमातून अभ्यास करणारे विविध देशांतील विद्यार्थी हेच आपल्या देशाचे खरे सांस्कृतिक दूत बनतील, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे व्यक्त केला.

येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नवीन क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते पुण्यात येऊ शकले नाहीत. त्यामुळे या कार्यालयाचे उद्घाटन इंडियन काऊन्सील फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्हीडिओ कॉन्फरंसींगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, आयसीसीआरचे संचालक उद्योजक मिलींद कांबळे, सैयद मेहमूद आखतर, संस्थेच्या विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ संचालक कलकित चंद, प्रा. डॉ. विजय खरे उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू झाले ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. चार महिन्यांपूर्वीच ‘आयसीसीआर’चे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय संस्कृती मंडळाच्या कार्यात गतिशीलता आणली आहे. आयसीसीआरचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती हा संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालयाने भारतातील विद्यापीठांसाठी घोषित केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात नवव्या स्थानावर आहे, त्याबद्दल मी कुलगुरू आणि विद्यापीठाच्या सर्व टीमचे अभिनंदन करतो. विद्यापीठाची ही प्रगती दिवसेंदिवस बहरत जावो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

राज्यपाल म्हणाले, जगातील विविध देशांशी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करताना विद्यार्थी हेच सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. जगभरातील अनेक देश भारताबरोबर सांस्कृतिक आदानप्रदान करण्यास उत्सूक आहेत. आजही कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, जपान आणि इतर देशांत भारताच्या संस्कृतीचा मोठा प्रभाव आढळतो. भारतीय संस्कृतीचा प्रसार-प्रचार झाल्यास त्याचा पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. पर्यटनाच्या माध्यातूनही सांस्कृतिक देवाण घेवाण होत असते. त्याच बरोबर कला, संगीत आणि नृत्य क्षेत्रात तरुण कलाकारांना व्यासपीठ पुरवणे हे परिषदेचे महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे म्हणाले, पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या ‘आयसीसीआर’च्या कार्यालयामुळे शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्याला गती मिळणार आहे. देशातील संस्थेची कार्यालये अधिक मजबूत करण्यावर भर देणार असून पुढच्या काळात गोवा आणि मुंबईचे कामही पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयातून करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक कुलगुरू नितीन करमाळकर यांनी केले. तर आभार प्रो-व्हाईस चान्सलर डॉ. एन. एस. उमराणी यांनी मानले. यावेळी विद्यापीठाचे रजिस्टार अरविंद शाळीग्राम, प्रभा मराठे, सतिश आळेकर, नीलेश कुलकर्णी, मनीषा साठे आदी उपस्थित होते.