कोयत्याने वार करुन तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे पोलीसनामा ऑनलाइन :

रागात का पाहतोस या कारणावरून तिघांवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.पर्वती येथील जनता वसाहतीमध्ये शनिवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा तपास दत्तवाडी पोलीस करीत असून या प्रकरणातील तिघा आरोपीना पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणातील निलेश संभाजी वाडकर (वय ३३), आदिनाथ सोपान साठे (वय २४) आणि शेखर बजरंग शेरखाने (वय ३१, तिघे रा़ जनता वसाहत, पर्वती) या तीनही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश कोळी (वय २०, रा़ जनता वसाहत, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कोळी हे सुरज कोळगे, विजय मारुती काळंबे, आकाश गोळे, सुदन सुरेराव, नुन्या पवार, मेहबुब, दत्ता, संकेत लोंढे हे त्यांच्या मित्रा समावेत स्वारगेट येथील एस टी स्थानकात काही खाण्यासाठी जात होते.जनता वसाहत मधील गल्ली क्रमांक 20 च्या जवळ आल्यावर आपल्याकडे रागात का पहातोस या कारणावरुन निलेश वाडकर आणि त्यांच्या मित्रानी गणेश कोळी बरोबर असलेल्या मित्रांना लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने डोक्यात वार केले.

या जखमी सर्वाना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दत्तवाडी पोलिसांनी यातील तिघां आरोपीना अटक केली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभंग हे करीत आहेत.