चारचाकी गाडीने चिरडवून मित्राचाच केला खून

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन
औरंगाबाद येथील मुकुंदवाडी परिसरात 19 वर्षीय तरुणाला चारचाकी गाडीने चिरडवून ठार मारले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या जुन्या वादातून ही भीषण हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हे दोघे एकाच कॉलेजला शिक्षण घेत असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव संकेत कुलकर्णी (19, मुळ रा. पाथरी, परभणी) ,असे आहे. तर शुभम डंख आणि विजय वाघ असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये (22, रा. गल्ली क्र. 11, जय भवानीनगर) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याचे वडील प्रल्हाद जायभाये यांना ताब्यात घेतले आहे.

दुचाकीवर जात संकेत कुलकर्णीला सिडको, एन-2 भागातील कामगार चौकात मागून धडक देवून अक्षरश: गाडी मागेपुढे करून अंगावर घातली. जायभायेने अतिशय क्रूरपणे तीन ते चार वेळा गाडीने संकेतला चीरडावून फरार झाला. यावेळी दुचाकीवर मागे बसलेले मित्र शुभम व विजय जखमी झाले आहेत. हे दोन्ही मित्र घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा क्रूरपणा सुरु असताना लोक फक्त बघत होते.

मयत संकेत बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून पुणे येथे शिक्षण घेत होता. संकेत कुलकर्णीचे वडील राजकीय व्यक्ती असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणातील चारचाकी गाडी ताब्यात घेतली असून जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपी संकेत जायभाये फरार असून पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत.