जन्मदात्यांच्या शोधासाठी लेकीने घातला भारतीय विवाहाचा घाट

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन
मुंबईतील सायन पोलिसांना ऑक्टोबर १९८१ मध्ये सापडलेल्या दीड वर्षाच्या मुलीला त्यांनी संगोपनासाठी मानव सेवा संस्थेत दाखल केले. सुदैवाने लगेचच काही दिवसांत स्वीडनमधील एक दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. त्या मुलीच्या वाढत्या वयानुसार जशी समज आली तसे तिची आपल्या जन्मदात्यांविषयी उत्सुकता वाढू लागली.
वयात आल्यानंतर स्वीडनमध्येेच प्रियकरासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहू लागली. त्यांना दोन मुलेही झाली. आपल्या भारत देशाबद्दल आणि खर्‍या आई वडीलांबाबत जाणून घेण्यासाठी ती पती आणि दोन मुलांसह भारतात आली. पोलिसांकडून माहिती घेऊनही आई वडीलांचा काही शोध न लागल्याने आपल्या तिने प्रियकरासोबत चक्क भारतीय पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. येत्या १४ एप्रिलला हा विवाह होणार असून किमान या विवाहाच्या बातम्या वाचून तरी आई वडीलांचा शोध लागेल,अशी तिची शेवटची अपेक्षा आहे.

जेसिका कमलिनी लिंडेर असे त्या युवतीचे नाव असून ग्रॅएम असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. अगेंस्ट चाईल्ड ट्रॅफिकिंगच्या ऍड. अंजली पवार आणि अरुण डोल यांनी जेसिकाच्या या विवाहसोहळ्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना ऍड.अंजली पवार म्हणाल्या, की सायन पोलिसांना १० ऑक्टोबर १९८१ मध्ये एक चिमुरडी सापडली होती. त्यांनी सुश्रुषेसाठी तिला मुंबईतील मानव सेवा संघामध्ये ठेवले. दरम्यान, तिच्या आई वडीलांचा शोध लागला नाही म्हणून मानव सेवा संघाने तिला स्वीडनच्या एका दांम्पत्याला दत्तक दिले. त्यांनी तिचे नाव जेसिका ठेवून स्वीडनमध्येच तिचे पालन पोषण केले.

दरम्यान जेसिका जसजशी मोठी झाली तसे तिला खर्‍या आई वडीलांबाबत कुतुहल निर्माण झाले. या काळात ती प्रियकर ग्रॅएमसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली. स्वीडनच्या अगेंस्ट चाईल्ड ट्रॅफिकिंग या संस्थेच्या मार्फत ती मागील वर्षी मार्च महिन्यात भारतात आली. ती लहानपणी ज्या पोलिसांना सापडली त्यावेळच्या तपास अधिकार्‍यांची भेट घडवून आणली गेली. परंतू तिला दत्तक दिल्यानंतर तिच्या खर्‍या आई वडीलांचा तपासात फारशी प्रगती झालेली नव्हती. मात्र, यानंतरही तिने शोध थांबविलेला नाही. भारतात येऊन प्रियकरासोबत भारतीय पद्धतीने विवाह करून त्याला भारतभर प्रसिद्धी दिल्यास किमान त्या बातम्या वाचून तरी खरे आई वडील पुढे येतील अशी तिला आशा आहे. म्हणूनच आमच्या संस्थेने जेसिका आणि ग्रॅएमचा भारतीय पद्धतीने विवाह करण्याचे ठरविले आहे.”

विशेष म्हणजे, महिला व बाल कल्याण विकास विभागाचे आयुक्त लहुराज माळी या विवाहसोहळ्यात जेसिकाचे कन्यादान करणार आहेत. हा विवाहसोहळा मी राहात असलेल्या धनकवडी स.न.३५, मोहननगर जवळील सत्यसाई नगर हौसिंग सोसायटीच्या आवारात दुपारी चार वाजता होणार असल्याचे ऍड.अंजली पवार यांनी सांगितले.

 

You might also like