जावयाची गाढव स्वारी यंदा रंगली जोरात…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

देशभरात धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सगळे रंगात रंगून जातात तसेच या सणाच्या निमित्तानं काही पारंपरिक रंग देखील पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील विडा या गावात दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. या वर्षी देखील ही परंपरा कायम ठेवत विडेकरांनी वाजत गाजत- जावयाची मिरवणूक काढली.

केज तालूक्यातील विडा या गावी धुलीवंदनाच्या दिवशी जावयाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा आहे. जावई म्हटल की सासरकडील मंडळींकडून जावयाचा थाट आणि रुबाब आपल्याला ब-याच ठिकाणी पाहायला मिळाला असेल. पण, विडा या गावात मात्र आपल्याला जावयाच्या बाबतीत थोड वेगळ चित्र पाहावयास मिळेल. धुलीवंदनाच्या दिवशी जावयाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा गेल्या ८० वर्षांपासून या गावात चालू आहे. विडा येथील आनंदराव ठाकूर यांनी निजाम काळात ऐंशी वर्षांपूर्वी धूलिवंदनाच्या दिवशी स्वत:च्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली होती. तेव्हांपासून दरवर्षी विड्यात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्यात येते. जावयाला गळ्यात खेटराची माळ घालून फिरवले जाते आणि गावभर जावयाची धिंड काढल्यानंतर त्यांचा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर मोठ्या मानापानाणे नाराज झालेल्या जावयाला ग्रामस्थांकडून कपड्यांचा मनपसंत आहेर आणि सासर्‍यांकडून सोन्याची अंगठी दिली जाते.

यंदा होळीच्या एकदिवस अगोदर महादेव घोरपडे सासरवाडीत आलेले होते. ते एकदिवस अगोदरच गावातून निघण्याच्या तयारीत होते परंतु त्यांना सांगितले की, आम्ही बाहेरगावावरुन दुसरा जावई आणला आहे त्यामुळे तुम्ही निश्चित रहा. परंतु त्या दिवशी रात्री बाराच्या सुमारास ते झोपलेले असतांना त्यांना पकडून आणले आणि रात्रभर त्याना एका खोलीत सर्वांच्या नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यांची गावभर डॉल्बी व बँडबाज्याच्या तालात गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सरपंच आणि गावकऱ्यांच्या हस्ते कपड्यांचा आहेर आणि सासर्‍यांकडून सोन्याची अंगठी दिली. महादेव घोरपडे हे विडा येथील एकनाथ पवार यांचे जावई आहेत. एकनाथ पवार हे देखील इथलेच मोहनराव घोरपडे यांचे ते जावई आहेत त्यांना देखील पाचवर्षापूर्वी गर्दभ स्वारीचा मान मिळाला होता.

या मिरवणुकीचा मान कोणाला मिळणार याची मोठी उत्सुकता येथील पंचक्रोशीत असते. धुलीवंदनाच्या अगोदर गावकरी वेगवेगळे गट करून समूहाने जवायाच्या गावाला जातात आणि जावयाला पकडून आणतात. मिरवणुकीच्या भीतीपोटी या गावचे जावई दोन दिवस भूमिगत राहत असलेले अनेक किस्से येथील जावयांच्या बाबतीत घडतात. हा कार्यक्रम पाहाण्यासाठी जिल्ह्यातील  आणि जिल्ह्याबाहेरील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यंदा हा कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांची देखील विशेष गर्दी पाहावयास मिळाली. कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like