टिळक रोडवर थरार; घरगुती वादातून तिघांवर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
घरगुती वादाचा जाब विचारण्यासाठी आलेल्या तिघांवर एकाने कोयत्याने वार केल्याची घटना गुरुवारी (दि.29) सायंकाळी सातच्या सुमारास टोळक रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शेधार्थ खडक पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.

मजू नरकटे, सीमा करण शिंदे आणि दत्तात्रय ढोमसे (रा़ अपर इंदिरानगर) हे तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. शांताराम असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शांताराम आणि मजू हे पती पत्नी आहेत. शांताराम हा टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर असलेल्या एका कंपनीत कामाला आहे. या दोघांमध्ये आज सकाळी घरगुती वाद होऊन त्यांच्यात जोरदार भांडण झाले.
याचा जाब विचारण्यासाठी आज सायंकाळी सातच्या सुमारास मजू, सीमा शिंदे आणि दत्तात्रय ढोमसे हे शांतारामच्या घरी आले होते. त्यावेळी शांताराम आणि या तिघांमध्ये बाचाबाची झाली. चिडलेल्या शांतारामने त्यांच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर तो फरार झाला. या घटनेची माहिती खडक पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून आरोपीचा शोध घेत आहेत