पाकिस्तानमध्ये धर्म व नैतिकतेच्या कारणावरून शाळांमध्ये डान्सवर बंदी

लाहोर: पोलीसनामा ऑनलाईन

यूट्युब, फेसबूक, इंटरनेट, बॉलिवुड चित्रपट आणि असंख्य गोष्टींवर बंदी लादण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानने आता शाळांवर आणखी एक बंदी थोपवली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, यापुढे कुठल्याही शाळेत डान्सचे कार्यक्रम चालणार नाहीत. पंजाब सरकारने सरकारी आणि खासगी अशा दोन्ही शाळांमध्ये ही बंदी लागू केली आहे.

पाकिस्तानी दैनिक एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा, गॅदरिंग, टीचर्स डे, पॅरेन्ट्स मीटिंग आणि अॅनुअल-डे अशा कुठल्याही कार्यक्रमात मुला-मुलींना नाचू दिले जाणार नाही. यापूर्वी बॉलिवूड आणि स्थानिक गाण्यांवर लहानगे थिरकत होते. पण, आता असा कुठलाही कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

पंजाब प्रांत सरकारने जारी केलेल्या आदेशात या बंदीसाठी नैतिकता आणि धर्माचे कारण दिले आहे. लहानग्यांनी नाचणे हे धर्माच्या आणि नैतिकतेच्या विरोधात आहे. अशा कार्यक्रमांमुळे मुलांवर लहानपणापासूनच अनैतिक संस्कार घडतात असा त्यांचा दावा आहे. कुठल्याही सरकारी किंवा खासगी शाळेने यापुडे डान्स कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील. सर्वच वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय अशा शाळांवर नजर ठेवून आकडेवारी पाठवत राहावी असेही आदेश बजावण्यात आले आहेत.