पोलिस शिपाई पदासाठी डॉक्टर,अभियंते देखील उत्सुक

पालघरः पोलिसनामा ऑनलाईन

पोलीस शिपाई पदासाठी बारावी पास पात्रता आहे पण भरतीसाठी येणारे फार तर पदवीधर झालेले उमेदवार येत असत. मात्र आता आयुर्वेदिक डॉक्टर, अभियंते, बीएससी, बीफार्म, इंटेरिअर डिझायनर, संगीतामधील पदवीधर ही सर्व मंडळी चक्क पोलीस हवालदार पदासाठी मैदानात उतरली आहे. शासनाची उदासिनता आणि सरकारी नोकऱ्यांच्या कमी निघणाऱ्या जागा यामुळे नोकरी कोणतीही असुदेत पण ती सरकारी हवी या विचारातून विविध उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुण उमेदवारांनी पोलिस कॉन्स्टेबलपदाच्या नोकरीसाठी अर्ज केल्याचे आढळले.

पालघर जिल्ह्याच्या पोलिस दलातील १६० जागांसाठी राज्यभरातून तब्बल १९ हजार ५०० अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये अशा पदवीधरांची संख्याही लक्षणीय आहे. सध्या कोळगाव पोलिस परेड मैदानात पहाटे चारपासूनच या उमेदवारांच्या काटेकोर चाचण्या सुरू आहेत. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिस भरतीसाठी आठ बीएएमएस डॉक्टर, विविध विभागांचे ३३ इंजिनीअर, तर कृषी विषयात बीएससी केलेले १७ जण, १२ बीएससी (टेक), १८ बीसीएस, तसेच बीफार्म, इंटेरिअर डिझायनर, संगीत विषयामधील पदवीधर अशा उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुण उमेदवारांनी पोलिस शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

You might also like