मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली; दादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांचा रेल रोको

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन
रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी दादर – माटुंगा स्थानकादरम्यान रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. सकाळी कामावर जाण्याच्या वेळी विद्यार्थ्यांनी लोकल अडवल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत.

विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने सीएसटीएमकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. परंतु, त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप हे आंदोलक विद्यार्थी करत आहेत. ‘रेल रोको’ केलेल्या विद्यार्थ्यांना रूळावरून हटवण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून विद्यार्थी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. लाठी चार्जला प्रत्युत्तरादाखल संतप्त विद्यार्थ्यांनीही लोकलवर दगडफेक केली त्यामुळे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.