संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींवर १५ दिवस सामूहिक बलात्कार

कोरिया : वृत्तसंस्था
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलींना एका खोलीत डांबून त्यांच्यावर तब्बल १५ दिवस नऊ नराधमांनी अमानूष अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ पैकी सात जणांना अटक केली आहे.

कोरिया जिल्ह्यातील १७ आणि १५ वर्षांच्या दोन मुलींची मंगळवारी मध्य प्रदेशमधील बिजुरी रेल्वे स्थानक परिसरातून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर या दोघींनी पोलिसांना दिलेली माहिती धक्कादायक होती. ‘कोरिया जिल्ह्यातील अभिजीत पाल उर्फ पिंकू (२०) याचे यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते.त्याने ४ मार्च रोजी मुलीला भेटायला बोलावले होते. अभिजीतला भेटायला जाताना तिच्यासोबत मैत्रीणही होती. अभिजीतने त्या दोघींना खोंगापनी येथील गावात नेऊन एका घरात डांबले. यानंतर अभिजीत व त्याच्या आठ मित्रांनी दोघींवर बलात्कार केला. तब्बल १५ दिवस त्यांना या यातनांचा सामना करावा लागला.

पीडित मुलीच्या पालकांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी बिजूरी रेल्वे स्थानकातून पीडित मुलींची सुटका केली. यादरम्यान पोलिसांनी अभिजीत व त्याच्या सहा मित्रांना अटक केली. तर उर्वरित दोन आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.