संत तुकाराम बीजे निमित्त महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी लिहिलेला विशेष लेख…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

आपुल्या माहेरा जाईन मी आता

जग तसं दु:खानेच भरलेलं आहे. क्षणापुरते बरे वाटते. त्या बरे वाटण्याला आपण सुख समजतो. दुःखाचा जेवढा जीवनावर प्रभाव पडतो तेवढा सुखाचा पडत नाही. हास्यरसही एक क्षणिक लहर असते. दुःख मात्र सदैव हृदयात राहतं. ते असल्याची जाणीव करून देतं. हसतानाही दुःखाची सल जाणवते. जीवनातील उणीव भरून निघत नाही. जीवनाचं परिवर्तन दुःखाने होतं. विरक्ती, वैराग्य, त्याग दुःखाने येतं. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. दुःखातून सावरला नाही तर तो संत होत नाही, तर व्यसनी किंवा चोर होतो. नशा केल्याने दुःख जात तर नाहीच; परंतु दुःखाचा उठाव जास्त होतो. त्याला सहन करण्याची क्षमता व्यसनामुळे कमी होते. दुःख ज्याला पाहता आलं तो भाग्यवान. दु:खाचं स्वरूप जो शोधतो, त्याला आपलं स्वरूप कळतं. मान, अहंकार, लोभ यांचं खरं स्वरूप दुःख असतं. स्वतःचं असं काही दुःख नसतं. हे पाहिल्यावर कळतं. दोष आणि दुःख पाहता पाहता दुखाचंच अस्तित्व संपून जातं. आनंदाकार चित्तवृत्ती होते.

साडेतीन हातांच्या देहात वावरणारा ‘मी’ आकाशाएवढा होतो. हा सगळा प्रवास श्री संत तुकाराम महाराजांनी अनुभवला आहे.
श्री विश्वंभरबाबा-हरी-विठोबा-पदाजी-शंकर-कान्होबा-वोल्होबा-श्री तुकोबाराय अशी महाराजांची वंशावळ आहे. विश्वंभरबाबा मूळचे जावळी खोऱ्यातले; परंतु व्यापाराच्या निमित्ताने ते पवित्र इंद्रायणी तीरावर वसलेल्या देहू या गावी आले. इथेच ते स्थायिक झाले.
श्री विश्वंभरबाबा हे श्री नामदेवरायांचे समकालीन होत. श्री विठ्ठलभक्ती इथून प्रारंभ झाली. इ.स.१६०८ ते १६५० हा तुकाराम महाराजांचा कालावधी आहे. त्यांचे कुळनाव मोरे व उपनाव अंबिले होते. पहिलं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं. त्यांच्या पत्नीचं नाव ‘रखमाबाई’ सांगितलं जातं. ती अशक्त व सतत आजारी पडत असल्याने दुसरे लग्न गुळवे या घराण्यातील ‘अवलाई’ हिच्याशी झाले. तिचेच नाव ‘जिजा’ असे ठेवले गेले. घरात पिढ्यानपिढ्याची सावकारकी होती. जमीन जुमला प्रमाणापेक्षा अधिक होता. त्यांचे मोठे बंधू ‘सावजी’ हे विरक्त होऊन घरातून निघून गेले. लहान बंधू ‘कान्होबा’ त्यांच्या बरोबरच असत.

एक वादळी वाट तुकोबांरायांच्या जीवनात आली अन् सर्व सुख उद्ध्वस्त झालं. १६२८-२९ या वर्षात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. अन्न-अन्न करत माणसे प्राण सोडू लागली. गुरे-ढोरे मेली. रोगराईने कहर केला. अन्नाचा कण पोटात नसल्याने त्यांचा मोठा मुलगा व पहिल्या पत्नीने प्राण सोडला. घराण्याची व जीवनाची वाताहत झाली. दु:खाच्या अतिरेकाने महाराजांचं जीवन बदललं. मी कोण ? देव म्हणजे काय ? ही सृष्टी कोणी निर्माण केली ? मेलेली माणसे कोठे जातात ? आदी प्रश्नांच्या शोधात महाराज ‘भंडारा’ डोंगरावर जाऊन ज्ञानेश्वरीचं चिंतन करू लागले. इथून महाराजांमध्ये दिव्यत्वाचा प्रारंभ झाला. त्यांचा कण न् कण बदलला. दैवी शक्ती अवतरली. गुरू शोधावा लागला नाही. गुरूने येऊन अनुग्रह दिला.

माघ शुद्ध दशमी पाहूनी गुरुवार l
केला अंगीकार तुका ह्मणे

वाणी उमलली. कवित्व जागं झालं. अनुग्रहामुळे देवाचा साक्षात्कार झाला. गूढ उकललं. भक्तीप्रेमाचा प्रवाह अंतःकरणात वाहू लागला. मुखातून निघणारे शब्द अभंग झाले. हे सर्व चांगलं होत असतानाच काही चांगल्या माणसांना वाईट वाटू लागलं. महाराजांचा वाढलेला मान मान्यवरांना सहन होईना. एक व्यापारी वेदांत सांगू लागला. तो ‘गुरु’ होऊ पाहतोय. आताच यांना आवरा, नाहीतर अनर्थ होईल. गावातील मंबाजी दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्टाकडे गेले. त्यांनी ग्रंथ बुडविण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे तो बुडविला. महाराजांनी तेरा दिवस उपवास केला. बुडालेल्या वह्या वर आल्या. हे चरित्र कोणी सांगितले नसून त्यांच्याच अभंगात आहे.

निषेधाचा काही पडीला आघात l
तेणे मध्ये चित्त दुःखावले l

मृत्यू आणि म्हातारपण कोणालाही चुकलेलं नाही. महाराजांनी हे चुकविलं. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी महाराज म्हणतात,

आता दिसो नये जना l
ऐसे करी गा नारायणा ll

आपल्या भावविश्वात रमणारे महाराज अदृष्य रुपाने वावरणाऱ्या सनकादिक संतांना देवांनी वैकुंठाला न्यावं, असा आग्रह धरतात. सनकादिकांनी महाराजांना सांगितलं. एवढा आनंद त्यांना झाला. ते प्रत्येकाला सांगू लागले….

आपुल्या माहेरा जाईन मी आता l
निरोप या संता हाती आला ll

मनुष्य जीवनाची सार्थकता, सफलता हीच की अंती देव भेटावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, यासाठीच तर परमार्थ करायचा आहे. फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे महाराजांचं वैकुंठगमन अर्थात श्री तुकाराम बीज होय.

हाती धरोनिया देवे नेला तुका l
जेथे नाही लोका परिश्रम ll
 लेखक: डॉ. नामदेव महाराज शास्त्री (श्री क्षेत्र भगवान गड)

 

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like