सतर्क शिक्षकांमुळे टळले विद्यार्थींनीचे अपहरण

नेवासा : पोलिसनामा ऑनलाईन
शहरातील बदामबाई धनराज गांधी विद्यामंदिर या माध्यमिक शाळेतील आठवीतील मुलीचे सिनेस्टाइल अपहरण करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेने उधळला गेला. या प्रकरणी सहा मुलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या अपहरणनाट्यप्रकरणी कै. बदामबाई धनराज गांधी विद्या मंदिर या शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन नामदेव शेंडे (वय ४९) यांनी नेवासा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे,”आमची शाळा पाचवी ते दहावी असून या ठिकाणी नेवासा शहर व परिसरातील मुले व मुली शिक्षणासाठी येतात. सध्या शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. गुरुवारी (१ मार्च) शाळेतील शिक्षक अजय राखमाजी आव्हाड यांनी सकाळी अकराच्या सुमारास सांगितले की, शाळेमध्ये कोणीतरी मुले आली आहेत. त्यानुसार त्यापैकी एका मुलाला बोलावले असता त्याने आठवीतील त्या मुलीचे नाव सांगितले व तिची आई आजारी असून आपण तिला घेण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. शिक्षकांनी नाव विचारले असता त्या मुलाने गणेश शिंदे असे सांगितले; मात्र, शिक्षकांनी त्या मुलीचा भाऊ, असे सांगितले मग आडनाव वेगळे कसे, असा विचार येऊन आपला संशय बळावला. गणेश सोबत आणखी पाच ते सहा मुले होती.” गणेश याला शाळेत थांबून ठेवले आहे हे लक्षात येताच इतर मुलांनी तेथून पळ काढला. गणेश याला विविध प्रश्न शाळेतील शिक्षकांनी विचारले असता प्रत्येक उत्तरात विसंगती आढळली.

You might also like