अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा स्थगिती, सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण -धनंजय मुंडे

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

अंगणवाडी सेविकांना लागू केलेला जुलमी मेस्मा कायदा (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा) स्थगित केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी केली. सरकारला उशिरा सुचलेले हे शहाणपण म्हणावे लागेल, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाच्या दबावामुळे सरकारला अखेर झुकावे लागलेच, असेही मुंडे यांनी सांगितले.

सोमवारपासून आम्ही सातत्याने विधिमंडळात चार दिवस हा विषय लावून धरला, चर्चा केली आणि आक्रमक भूमिका घेतल्यानेच सरकारला हा मेस्मा सारखा जुलमी कायदा रद्द करावा लागला. सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण असले तरी या विषयावर सरकारने चार दिवस वाया घालवले. या पुढे ही आम्ही अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी लढत राहू, असेही धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अंगणवाडी सेविका प्रश्नी शिवसेनेचा श्रेयासाठी आटापिटा आणि दुटप्पी भूमिका आहे. असे निर्णय होत असताना सेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकात गप्प बसतात आणि सभागृहात विरोध करतात, हे फक्त दाखवण्यासाठी आणि श्रेयासाठी आहे. मेसमा रद्द करण्याचे श्रेय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्ष यांचेच आहे, असा दावाही मुंडे यांनी यावेळी केला.