अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ ला अखेर स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
अंगणवाडी सेविकांवरील प्रश्नासंदर्भात विरोधकांसमोर राज्य सरकार अखेर झुकले आहे. अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित करण्याची घोषणा केली.
अंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करावा, या मागणीवरुन काल विधानसभेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. मेस्मा कायदा रद्द करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला विरोधकांनीही पाठिंबा दिला होता. विधानसभेत आक्रमक झालेले शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंडही पळवला होता. या प्रकरणावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता.
अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा कायद्याला स्थगिती देणे म्हणजे विरोधकांनी आणलेल्या दबावाचा विजय आहे. शिवाय, राज्य सरकारला उशिरा आलेले शहाणपण आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले.