अखिल भारतीय तिसरे मराठी लोककलासंमेलन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या सहयोगाने पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत प्रथमच दिनांक ७ ते ८ एप्रिल रोजी ‘अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन’होणार आहे, या सोहळ्यात लोककलेत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे, जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध लावणी कलावंत आणि चित्रपट अभिनेत्री लीलाताई गांधी यांना तसेच साहित्याच्या माध्यमातून लोककलेला प्रकाशात आणणाऱ्या प्रसिद्ध लेखक प्रभाकर मांडे यांना कलागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती  ‘अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप, स्वागत समिती अध्यक्ष महापौर नितिन काळजे आणि स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाच्या अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करणारे, लोककला आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दोन दिवसीय संमेलन होणार आहे. ‘‘महाराष्ट्राच्या संस्कृतीत रूजलेल्या लोककलांनी आणि लोककलावंतांनी संस्कृती जतन करण्याबरोबच सांस्कृतिक अभिसरण घडावे,यासाठी प्रयत्न केले आहेत.लोककला परंपरा आणि कलामहर्षींचा गौरव करण्यात यावा. तसेच महाराष्ट्राच्या अस्सल संस्कृतीचे दर्शन स्मार्टसिटीतील नागरिकांना घडावे, यासाठी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन’ आयोजित केले आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये योगदान देणाऱ्या विविध कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोककलावंत लीलाताई गांधी यांना देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख,स्मृतिचिन्ह,शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच प्रसिद्ध लेखक प्रभाकर मांडे यांना कलागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये रोख,स्मृतिचिन्ह,शाल-श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे. त्याचबरोबर विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये वसंत अवसरीकर (सोंगाड्या), संजीवनी मुळे-नगरकर (लोकनाट्य), बापूराव भोसले (गोंधळी), सोपान खुडे (साहित्य गौरव), पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तन), मुरलीधर सुपेकर (शाहीर), प्रतिक लोखंडे (युवा शाहीर). २१०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘‘पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या विकासात कला सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे योगदान आहे”.त्यामुळेच औद्योगिकनगरी आता सांस्कृतिकनगरी म्हणूनही ओळखू लागली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने १९९९ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र शाहिर परिषदेच्या वतीने शाहीरी संमेलनही भरविले होते. नाट्य परिषद रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. या शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय ३ रे मराठी लोककला संमेलन आयोजित केले आहे. या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सहकार्य केले आहे.

पत्रकार परिषदेस पक्षेनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, संयोजन समितीचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे, समन्वय समितीचे प्रमुख सुहास जोशी, संतोष पाटील, संतोष शिंदे, राजू बंग, संतोष रासने आदि उपस्थित होते.