अजिंठा लेण्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविणार : पर्यटन सचिव रश्मी वर्मा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन
भारतातील बारा ऐतिहासिक पर्यटन स्थळांची निवड ‘आयकॉनिक साईट’मध्ये करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. अजिंठासह वेरूळ येथील लेण्यांना पर्यटन विकासाच्या दृष्टीने जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा लवकरच पुरविण्यात येणार असल्याचे केंद्रीय पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांनी आज येथे सांगितले.

यावेळी वर्मा म्हणाल्या की,”अजिंठा येथील लेणी परिसरात पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अजिंठा येथील लेण्या या पर्यटनाच्या दृष्टीने अमूल्य असा पुरातन ठेवा असून त्याचे जतन करण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशिल आहे.

अजिंठा लेणी तसेच परिसरात असलेल्या असुविधा दूर करुन लवकरात लवकर जागतिक दर्जाचा सोयीसुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्याबरोबरच उत्कृष्ट रस्ते, पाणी, अद्ययावत यंत्रणा, उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पर्यटन महामहामंडळाच्या वतीने स्थानिक समस्यांबरोबरच येथील सोयीसुविधांचा आढावा घेण्यात येत असून त्यासंदर्भात अहवाल तयार करण्यात येत आहे. पर्यटन विकास वाढीच्या दृष्टीने स्थानिक उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, नागरिक यांच्याशी चर्चा करुन प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी असलेल्या सर्व लेण्यांना त्यांनी भेट देत प्राचिन कलाकुसरीचे कौतुक केले. आयकॉनिक साईटमध्ये अजिंठा, वेरुळ या पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.