अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचा रस्ता रोको

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

कोल्हापूर शहराचा एन्ट्री पॉईंट म्हणून ओळखल्या जाणा-या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. रस्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल.

कोल्हापूर शहराचा एन्ट्री पॉईंट म्हणून ओळख असणाऱ्या तावडे हॉटेल परिसराला गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामांनी विळखा घातला आहे. हा विषय पूर्वी न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं. परंतु तावडे हॉटेल परिसरातील सर्व अतिक्रमण महापालिकेने हटवावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परंतु न्यायालयाच्या आदेशाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत अनधिकृत बांधकामावार कारवाई केलीच नाही. उलट अतिक्रमाणकडे दुर्लक्ष करावं म्हणून आमदार खासदार महालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार तावडे हॉटेल परिसरातील अनाधिकृत बांधकामावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी या मागणी साठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुर शहरात येणारी वाहतूक शिवसैनिकांनी रोखल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. तसंच या आंदोलनामुळं वाहनांच्या लांबललांब रांगा लागल्या होत्या. या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने दिला आहे.

यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळ तावडे हॉटेल परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्याने भाषणा दरम्यानच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.