अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत कोट्यावधी रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त

एफडीए व गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची संयुक्त कारवाई

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

अन्न व औषध प्रशासन व गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत चार टेम्पोसह सुमारे 1 कोटी 70 लाख 80 हजार रुपयांच्या किंमतीचा विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील कुरळी फाटा पेट्रोल पंपासमोर करण्यात आली. मालाची वाहतूक करणारे चार टॅम्पो देखील जप्त करण्यात आले असून ते गुजरात राज्यातील आहेत. सोनु मेवालाल सरोज,मनोज संतराम यादव,दिपक रामभरत मोर्या, संतोष अमरनाथ चौरशीया या चालकांकडून गाडीसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.16) पहाटे गुन्हे अन्वेषन शाखा व एफडीएला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुरळी फाटा या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. त्याच वेळी संशयीत चार टेम्पोची तपासणी केली असता मोठ्याप्रमाणात गुटख्याचा साठा मिळून आला. या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता हा संपूर्ण मुद्देमाल निलेश उद्धव बोराटे (रा.मालाड कॉलनी शेजारी, मोशी, ता.खेड जि.पुणे) याने गुजरात राज्यातून विक्रिसाठी मागविला असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.

75 कारवायांमध्ये पाच कोटींचा गुटखा जप्त

पुणे जिल्ह्यात एप्रिल 2017 पासून आत्तापर्यंत 75 जप्तीच्या कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये तब्बल 5 कोटी 44 लाख 14 हजार 158 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली 1 कोटी 42 लाख रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकंदर संपुर्ण पुणे विभागाचा विचार केला तर विभागात आत्तापर्यंत 199 जप्ती करण्यात आल्या असून एकुण 9 कोटी 90 लाख 39 हजार 720 इतक्या किंमतीचा प्रतिबंधीत पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

वरिल प्रकारची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) शि.स.देसाई,सहाय्यक आयुक्त अ. गो. भुजबळ व गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक एस.बी. दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नारागुडे, आय. एस हवालदार यांनी केली.