अबब…७० वर्षीय आजोबांच्या पोटात निघाला आठ इंचाचा गोळा

पोलिसनामा ऑनलाईन : मोहन दुबे
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सत्तर वर्षांच्या आजोबांच्या पोटातून आठ इंचाचा गोळा काढण्याची शस्त्रक्रिया झाली. ही कामगिरी रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेमुळे ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे बरे झाले असून तब्बेत स्थिर आहे. बबन होळकर असे या ७० वर्षीय रुग्णाचे नाव आहे.

बबन होळकर (वय:७०) यांची अचानक तब्येत बिघडल्याने ६ फेब्रुवारी रोजी खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी पोटामध्ये काहीतरी असल्याने शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरविले, त्याप्रमाणे कुटुंबाला याची माहिती देऊन अडीच लाख रुपये खर्च होणार असल्याचे सांगितलं. परंतु एवढी मोठी रक्कम होळकर कुटुंब उभे करू शकता नसल्याने त्यांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्याचा उपाय सुचवला.

बबन होळकर यांना महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार करत शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांपुढे मोठे आवाहन होते. तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया चालली. यानंतर बबन होळकर यांच्या पोटातून चक्क ८ इंचाचा गोळा काढण्यात आला. डॉ.संजय पाडाळे, हर्षल सोनवणे, आरती फुलारी, राजेश गोरे आणि डॉ.चव्हाण या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समूहाने ही आवाहात्मक शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेमुळे बबन होळकरांना जीवनदान मिळाले आहे. मुख्य म्हणजे लाखो रुपये खर्च करण्याची गरज होळकर कुटुंबाला पडली नाही. ऑगस्ट महिन्यात अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करत महिलेच्या पोटातून १५ किलोचा गोळा काढला होता.

यावर तातडीने उपचार झाल्याने आजोबांचे प्राण वाचले आहेत. नाहीतर हा गोळा फुटून मृत्यू ओढावला असता. या प्रकारच्या आजारांचे प्रमाण फारच कमी आहे. शस्त्रक्रियेनंतर आजोबांची तब्बेत स्थिर आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सर्जन संजय पाडाळे यांनी दिली आहे.