अभिनवतर्फे कात्रज भाजी मंडईमध्ये कागदी पिशव्यांचे वाटप

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
प्लास्टिक पिशव्यांना हद्दपार करण्याच्या उद्देशाने शाळेमध्ये वर्तमानपत्रापासून कागदी पिशव्या बनवण्याची कार्यशाळा घेऊन प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी केवळ तीन तासात जवळपास पाच ते सहा हजार पिशव्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या कात्रज येथील भाजी मंडईतील फळे,भाजी विक्रत्यांना देत प्लास्टिक हटाव मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला,तसेच अशा प्रकारचे उपक्रम वर्षभर सातत्याने करून प्लास्टिक हद्दपार करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

यावेळी भाजीविक्रते वासुदेव भिडे ,राधाबाई जाधव ,माया सूर्यवंशी ,दीपाली झंजे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत आम्हीही या पुढे प्लास्टिकचा वापर टाळू पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध आहोत,असे आश्वासन दिले.

यावेळी नगरसेविका स्मिता कोंढरे, सामाजिक कार्यकर्ते ऍड.संभाजी थोरवे, संस्थेचे संस्थापक राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप, ऍड.दिलीप जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कलाशिक्षक महेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.