अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ५ ट्रक केल्या जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर यवत गावच्या हद्दीत अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या ५ ट्रकवर कारवाई करत ते जप्त करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

पुरंदरचे प्रांताधिकारी संजय असवले यांच्या सूचनेनुसार महामार्गावर यवत परिसरात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे एक पथक तयार करण्यात आले होते. यावेळी पुणे – सोलापूर महामार्गावरून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रक क्रमांक (एमएच १२ डी. जी. ६४४४), (एमएच ४२ बी. ८३८३), (एमएच १४ बीजे २५००), ( एमएच १२ ईएफ १४४) व (एमएच १४ ए एस ७८६४) ही वाहने बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना शुक्रवारी दुपारी आढळून आली.

या सर्व ट्रकवर कारवाई करत त्या ताब्यात घेऊन यवत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या आवारात लावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. यापुढील काळात देखील बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे प्रांताधिकारी संजय असवले यांनी सांगितले. या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणारांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे.