अहमदनगरमध्ये कुरिअर पार्सल बॉक्सचा स्फोट होण्यापूर्वी नेमके काय घडले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

कुरिअर पार्सलच्या बॉक्समध्ये भीषण स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. अहमदनगरमधील माळीवाड्यातील मारुती कुरिअरमध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. शहरातील मध्यवस्तीत पार्सलमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. परंतू हा स्फोट होण्यापूर्वी कुरिअर कार्यालयात नेमके काय घडले…

अहमदनगर मधील माळीवाडा भागातील ढोरगल्लीमध्ये संतोष रावसाहेब शिंदे यांचे श्री मारुती कुरीअर सर्व्हीस प्रा.लि.चे कार्यालय आहे. त्या दिवशी संतोष हे बी.आर.टी. येथील पर्सलची डिलीव्हरी देऊन घरी निघून गेले. दुपारी साडे तीन वाजता कुरीअर कंपनीत काम करणारी महिला कर्मचारी आश्वीनी पटेकर यांनी कुरीअर बॉय संजय क्षिरसागर यांना फोन केला. फोनवर त्यांनी सांगितले की, एक एफ.एम. रेडीओचे पार्सल आले आहे ते पुण्याला जाईल का. त्यावेळी त्यांनी जाईल असे सांगून पार्सल स्विकारण्यास सांगितले.

रात्री आठ ते साठेआठ च्या दरम्यान संजय पार्सलवर नाव टाकण्यासाठी कार्यालयात आले. पार्सलवर नाव टाकत असताना त्यांना एका जांभळ्या रांगाचे स्टार नक्षी असलेले आणि जिलेटीन पेपरमध्ये एक पार्सल खाली पडल्याचे दिसून आले. त्यातून कसलातरी आवाज येत होता आणि पार्सलमधून एक वस्तू बाहेर आल्याचे त्यांना दिसले. त्यांना पार्सलचा संशय आल्याने त्यांनी ते उघडून पाहिले. त्या पार्सलमध्ये एक एफ.एम. रेडीओ सारखी दिसणारी वस्तू होती. त्या सोबत एक हिंदीमध्ये लिहलेली चिठ्ठी होती.

चिठ्ठीमध्ये काय लिहले होते

ज्यावेळी संजय यांनी ती चिठ्ठी उघडली त्यामध्ये लिहले होते, मै नगमा शेख मेरा सलाम कबुल किजिये, मै आपके सरहद्द कॉलेज में पढी हूँ. आज आपके वजहसे अपने पैरोपे खडी हूँ. अच्छी नोकरी करती हूँ. पहले पूना मे रहती थी, अब अहमदनगर मे हूँ. आपके लिये मैने एक तोहफा भेजा है, मैने मेरी आवाज रेकॉर्डींग कि है, आप जरुर सुनिये सर, मुझे अच्छा लगेगा, अल्ला से दुआ करती हूँ आपकी हर ख्वाइश पुरी हो. संजय सर खुदा हाफीस. तसेच इसमे बॅटरी नही है, इसको चार्जींग लागे के सुनो असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहीला होता.

आणि स्फोट झाला…

या चिठ्ठीत लिहीलेला मजकूर वाचून संजय यांना संशय आला. त्यांनी त्या वस्तूमधील चार्जींगची पिन कार्यालयातील इलेक्ट्रीक बोर्डमध्ये घातली आणि एकच मोठा आवाज झाला. यावेळी रात्रीचे पावणे दहा झाले होते. या स्फोटामध्ये संजय यांच्या छातीला, हाताला, पायाला आणि कपाळावर जखमा झाल्या. तसेच कार्यालयाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संजय यांच्याबरोबर त्यावेळी संदीप भूजबळ हा कर्मचारी काम करत होता. तोही या स्फोटामध्ये जखमी झाला. संजय क्षिरसागर आणि संदीप भुजबळ यांना परिसरातील नागरिकांनी एका रुग्णायात उपचारासाठी दाखल केले.

पोलिसांना घटनास्थळी काय सापडले

घटनेनंतर फॉरेन्सीक सायन्स लॅबोरेटरी नाशीक येथील एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एफ.एम. रेडीओ सारखी वस्तू ताब्यात घेतली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून एक लोखंडी गोलाकार नळकांडे, त्यामध्ये सफेद पावडर व खालील बाजूस बंद असलेले आणि लहान मोठे आकाराचे लोखंडी तुकडे जप्त केले. तसेच मध्यभागी वाकलेला सी.पी.युचा पत्रा, एक चौकोनी पत्र्याचा एक्स्टेंशन बोर्ड, त्यावर ६ अे पॉवर स्टॉप असे लिहले होते. प्लॅस्टीक फायबरचे पांढरे लहान मोठे तुकडे, इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट त्याच स्वीच सर्कीटचे लाहन मोठे पार्ट, स्पीकरचे अवशेष त्याल लोहचिंबक व जाळी, माती मिश्रीत लहान मोठे प्लास्टीकचे तुकडे अशा वस्तू पोलिसांनी जप्त केल्या.