आज ते दोघे पुन्हा एकाच व्यासपीठावर

परळीः पोलीसनामा आॅनलाईन
आज परळीत पुन्हा एकदा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे दोघे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. निमित्त होते सामुदायिक उपनयन संस्कार सोहळयाचे. यापूर्वी धनंजय मुंडे यांना ‘लोकमत’ वृत समूहाच्या वतीने राज्यातील शक्तिशाली राजकारणी म्हणून गाैरविण्यात आले. या प्रसंगी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असे दोघे उपस्थित होते. यावेळी दोघांनी एकमेकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेत दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्यावरुन पंकजा मुंडे यांच्यावर टिका केली होती.

राजकीय व्यासपीठावर जरी एकमेकांवर टीका केली असली तरी यावेळी ब्राम्हण संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना दोघांनी एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख केला. आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक असलो तरी आमच्यामधील बहिण- भावाचे नाते अतूट असल्याचे संकेत दोघांनी ही या कार्यक्रमाप्रसंगी दिले.