‘आधार लिंक’ अनिवार्यच, बायोमेट्रिक रेशनकार्ड धारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य

मुंबई – आधारकार्ड रेशन कार्डला जोडणे अनिवार्यच असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.एक मार्चपासून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार असल्याने आता आधारकार्ड रेशन कार्डशी जोडावे लागणार आहे.

एक मार्चपासून राज्यात बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या सचिवांना सादरीकरण देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. यासंदर्भातील विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ता अझीझ पठाण यांच्याकडून दाखल करण्यात आली होती. जी निकाली काढताना दिलासा देण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे.

राज्यात बायोमेट्रिक पद्धतीने रेशनिंग धान्य देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी रेशनकार्ड धारकांना त्यांचा आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडावा लागणार आहे. पण यात मोठ्या चुका होत असून गरज नसतानाही आधारची सक्ती करणे योग्य नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. या संदर्भात राज्यभरात अनेक ठिकाणी माहितीचे संगणकीकृत करताना चुका झाल्याच्या तक्रारी आल्याचे म्हटले होते. एकट्या नाशिकमध्ये चुकीची माहिती अपलोड झालेल्या शिधापत्रिका ७४ हजारांच्यावर असल्याचेही या याचिकेत म्हटले होते. या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार करूनही तोडगा निघाला नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.