आमच्या बहिणीने चिक्कीमध्ये पैसे खाल्ले : धनंजय मुंडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन चार वर्षाचा काळ उलटला. मात्र या चार वर्षांत सरकारने सर्व सामान्य नागरिकांसाठी निर्णय घेतले नसून या सरकारमधील 16 मंत्र्यांनी तब्बल 90 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. मुख्यमंत्र्यानी त्यांच्यावर कारवाई केली नाही. या घोटाळ्यामध्ये आमच्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

पुण्यात आयोजित हल्लाबोल सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की,”केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षाचा काळ लोटला. या कालावधीमध्ये सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भाजपचे लक्ष नसून केवळ भाजप मंत्री भ्रष्टाचार करण्यावर लक्ष देत आहेत.राज्यातील भाजपच्या 16 मंत्र्यानी 90 हजार कोटींचे घोटाळे केले. पण त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही कारवाई केली नाही.तर उलट त्यांना काही तासात क्लीन चीट देण्याचे काम केले आहे. या भाजपच्या मंत्र्यानी चिक्कीपासून उंदरापर्यंत घोटाळा केला आहे. या घोटाळयामध्ये आमच्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. असे सांगत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.

मुंडे पुढे म्हणाले की,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनी जेवढी आश्वसने दिली. त्यातील एक सुद्धा पूर्ण करणे भाजप सरकारला जमले नाही. भाजप सरकार सत्तेमध्ये येण्याचे मुख्य कारण हे तरुणाईला वर्षाला दीड कोटी रोजगार देणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे तरुणाईने भाजपला मतदान केले. तर आज अखेर किती रोजगार मिळाले याची आकडेवारी सरकारकडे नाही. हाताला असलेला रोजगार गेला.गिरीष बापट यांच्याविरोधात मी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते की धनंजय मुंडे यांचे आरोप खोटे आहेत. आज कॅगच्या अहवालात स्पष्ट होत आहे की राज्यात तुरीच्या डाळीत भ्रष्टाचार झाला आहे. याला जबाबदार सर्वस्वी भाजप सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

पुढे बोलताना मुंढे म्हणाले, शहीद राजगुरू यांनी देशासाठी प्राण दिले. ते संघाचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही दुर्देवी बाब आहे. संघ सोळाव्या शतकात नव्हता म्हणून बरे झाले. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज देखील संघाचे होते असे बोलण्यास ते विसरले नसते. अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर त्यांनी टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फसवणीस साहेब, माझी जीभ घसरली : धनंजय मुंडे

राज्यातील सर्व सामन्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फसवणीस साहेब अपयशी ठरले आहेत,”असा उल्लेख करताच सभेत एकच हशा पिकला तर टाळ्या वाजवून नागरिकांनी दाद दिली. ते पुढे म्हणाले की,”माझी जीभ घसरली. असे मला म्हणायचे नव्हते,” असे सांगताच पुन्हा हशा पिकला. त्यांनी त्यानंतर मुख्यमंत्र्याचा संपूर्ण भाषणात देवेंद्र फसवणीस असा उल्लेख केला.