आर आर आबांच्या तिस-या स्मृतीदिनाचा राष्ट्रवादीच्य नेत्यांना विसर

सांगलीः पोलिसनामा आॅनलाईन

पवार घराण्याशी घरचे नाते असणारे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा आज तिसरा स्मृती दिन. पण, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी फिरवली अंजनीकडे पाठ! विविध सभांमध्ये आर आर आबांची उपरती होणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आबांच्या तिसऱ्याच स्मृती दिनाचा यांना विसर पडला आहे.
स्वच्छ चारित्र्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा म्हणून आर आर पाटील यांची अोळख होती. पण आबांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याला यायला वेळ मिळाली नाही, की त्यांना या दिवसाचाच विसर पडला? असा प्रश्न सांगली जिल्ह्यातील जनतेला पडला आहे. ज्या नेत्याने पक्ष वाढीसाठी रात्रीचा दिवस केला, अनेक आव्हानांना तोंड दिले, राष्ट्रवादीवर होणा-या शाब्दिक हल्ल्यांना आबांनी निधड्या छातीने झेलत त्यांच्या स्टाईल मध्ये चोख उत्तरे दिली.

विशेष म्हणजे आबांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना होणारी उपरती हा दिखावा आहे कि काय असाच प्रश्न तासगाव तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जनतेला पडलाय.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा यांचा आज तृतीय पुण्यस्मरण दिन. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांच्या अंजनी या गावामध्ये शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होत.  पत्रिकेत राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांसह, दिलीप वळसे-पाटील. खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची नावे होती. मात्र सर्व नेते सरकारवर हल्लाबोल करण्यामध्ये व्यस्त आहेत, पण, तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या या कार्यक्रमास काँग्रेसचे माजी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री प्रतीक पाटील, विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम, शिवसेना आमदार अनिल बाबर ही इतर पक्षातील मंडळी उपस्थित होती.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र आपल्या एवढ्या मोठ्या नेत्याचा तीनच वर्षात विसर पडला आहे, ही बाब नक्कीच वेदनादायी आहे. काही दिवसांपूर्वीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आबांची आठवण पुणे येथील भाषणामध्ये काढली आणि आबांच राजकारणातलं आणि राष्ट्रवादीमधलं महत्व काय होत हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधून मधून आबांची होणारी ही उपरती केवळ दिखावाच आहे का? असं म्हणण्याची वेळ आलीय. कारण दिग्गज नेते सोडा सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अजनी कडे आज पाठ फिरवली. या कार्यक्रमाला आबांचे कार्यकर्ते, त्यांना मानणारे अनेक लोक मोठया प्रमाणावर हजर होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील दिग्गज किंवा दुसऱ्या फळीतील कोणतेही नेते या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. इतकेच नाही तर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेत्यांनाही आर आर आबांना श्रद्धांजली वाहायला येणे आवश्यक वाटले नाही.