आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म

गडचिरोली: पोलीसनामा ऑनलाईन
गडचिरोली येथील अहेरी तालुक्यात वेलगूरमधील राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीत शिकत असलेली विद्यार्थिनी बाळंतीण होऊन तिने एका मुलीला जन्म दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संस्थेने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच महिला व पुरूष अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित केले आहे .

या विद्यार्थिनीने नुकतीच दहावीची परीक्षाही दिली. परंतु , तरीही तिच्याबद्दल कोणत्याही शिक्षकाला, अधीक्षकांना संशयही आला नाही, याबद्दल तर्क वितर्क लढवले जात आहेत. आपल्याच वर्गात शिकणाऱ्या गावाकडच्या विद्यार्थ्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्या विद्यार्थिनीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देऊन आपली कोणाबद्दलही काही तक्रार नसल्याचे म्हटले आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही दहावीत असले तरी ते २० वर्ष वयाचे आहेत. यापूर्वी दुसऱ्या गावातील आश्रमशाळेत दोघेही काही वर्ष नापास झालेले आहेत, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी जी.पी.चौधरी यांनी दिली

या विद्यार्थिनीला वेदना होऊ लागल्यानंतर सुरूवातीला अहेरी व नंतर गडचिरोलीला भरती करण्यात आले. गडचिरोलीत तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे तिची ‘नॉर्मल डिलीव्हरी’ झाली आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे नंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. दरम्यान राजे धर्मराव शिक्षण संस्थेने मुख्याध्यापक एम.एस. कुर्वे, अधीक्षक आर.बी. पोलोजीवार व महिला अधीक्षिका डोंगरे यांना निलंबित केले. अशा घटना घडतात तरी याची साधी कुणकुणहि येथील शिक्षकांना लागत नसल्याने लोकांमध्ये शंका निर्माण होत आहे.