एकबोटेंना अटक का केली नाही : सर्वोच्च न्यायालय

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये एकबोटेंनी अटक का झाली नाही? असा प्रश्न न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला विचारला आहे. सुप्रीम कोर्टात जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर आज पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीत त्यांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पुण्यात अॅट्रॉसिटी आणि दंगल भडकावणे या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर एकबोटे यांनी पुणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतू तो फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या ठिकाणीही त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या अटकेचे वॉरंट काढण्यात आले होते.
दरम्यान, एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयत धाव घेतली होती. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. आज याची मुदत संपल्याने सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीत एकबोटे यांच्या अटकपूर्व अंतरिम जामीन 14 मार्चपर्य़ंत वाढवण्यात आला आहे.