एक लाखांची बॅग सापडली ती कोणाची?

पुणेः पोलिसनामा आॅनलाईन
दगडूशेठ हलवाई मंदीराच्या आवारात काही दिवसांपुर्वी एका महिला सुरक्षारक्षकाला रोख रक्कम सापडली होती. तर आठवड्यातच भवानीपेठ परीसरात तब्बल एक लाखाची बॅग रस्त्यावर सापडली आहे. विजय वल्लभ शाळा भवानी पेठ येथील मुलांना सोडण्यासाठी पालक गेले असता दुचाकीवरून जाणार्‍या एका व्यक्तीची बॅग रस्त्यावर पडलेली त्यांना सापडली. सापडलेल्या बॅगेबाबत खडक पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी बॅगेची पाहणी केली त्यावेळी त्यात एक लाख रुपये रोख रक्कम असलेली आढळून आली. या बॅगशी संबंधित व्यक्तीने खडक पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला शाळेत सोडण्यासाठी शनिवारी सकाळी चेतन नरेंद्र शर्मा (नानापेठ) हे विजय वल्लभ शाळेत गेले होते. त्यावेळी एक व्यक्ती दुचाकीवरून जात असताना त्याची बॅग रस्त्यावर पडलेली सापडली. याबाबत त्यांनी खडक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रामोशीगेट पोलिस चौकी येथील सहायक निरीक्षक बी.सी. गावीत यांना माहिती दिली. त्यांनी त्वरीत या बॅगची तपासणी केली तेव्हा या बॅगेत एक लाख रोख रक्कम असल्याचे आढळून आले. त्यात 10 रुपये, 20 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटा असल्याचे आढळून आले. अशा वर्णाची कोणाची बॅग हरविली असल्यास त्यांनी खडक पोलिस ठाण्याशी किंवा सहायक पोलिस निरीक्षक बी. सी. गावित आणि सहायक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.