एफडीएकडून अवैध गुटका विक्री करणा-या २३ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव

तीन पेक्षा अधिकवेळा गुटखा विक्रीचा गुन्हा करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यानुसार होणार कारवाई

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

अशोक मोराळे

पुणे शहर व ग्रामिण भागामध्ये पुणे पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने राबविलेल्या संयुक्त मोहिमेत कोट्यावधी रुपयांचा गुटखा व सुगंधीत सुपारी जप्त केला होती. याप्रकरणी अनेक लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात एफडीएच्या वतीने खटले दाखल करण्यात आले होते. तसेच या कारवाई नंतरही गुटखा विक्री करणा-यांवर जरब बसावी यासाठी एमपीडीए अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव पुणे आयुक्त आणि ग्रामिणचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. एमपीडीए अंतर्गत २३ जणांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने आपली गुटक्याच्या विरोधातली मोहिम तिव्र करत पुणे विभागात येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापुर या जिल्ह्यातील अनेक गुटका माफियांवर खटले दाखल केले होते.

ज्या गुटखा विक्रेत्यांनी वारंवार म्हणजे तीन पेक्षा अधिक वेळा गुन्हा केला आहे. अशा लोकांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या संबंधीचा विभागीय अहवाल नुकताच एफडीएने तयार केला असून तो लवकरात लवकर प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

मागील काही दिवसापूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी राज्यात गुटखा बंदी असताना देखील मोठ्याप्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुटखा माफियांवर मोका कारवाई करण्याची सुचना केली होती. याच पार्श्वभूमीवर एफडीएकडून ही कारवाई करण्यात येणार आहे. गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या लोकांची मोठी साखळी कार्यरत असून, हा संघटित गुन्हेगारीचाच एक प्रकार असल्याचे निदर्शनास आणून देत या सर्व गुटखा माफियांवर ‘मोका’ची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बापट यांनी दिली होती.

यापुढील काळात गुटख्याची विक्री करणे हा गुन्हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून, या प्रकरणी दोषी आढळल्यास किमान सात वर्षांची शिक्षा व आवश्यकता भासल्यास ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

एफडीएने पुणे विभागात केलेली कारवाई

मार्च अखेर पुणे विभागात 402 गुटखा विक्रीच्या संदर्भात तपासण्या करण्यात आल्या असुन त्यापैकी पुणे जिल्ह्यात 119 करण्यात आल्या आहेत. एफडीएने २२४ जप्तीच्या कारवाई केल्या आहेत, त्यापैकी ८१ जप्तीच्या कारवाई पुणे जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत ४ कोटी ७ लाख ३८ हजार २६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पुणे विभागात करण्यात आलेल्या कारवाईत ८ कोटी ६४ लाक ५५ हजार ५१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे विभागामध्ये कोल्हापुर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापुर जिल्ह्यांचा समावेश आहे.

दाखल करण्यात आलेल्या खटल्यांची आकडेवारी

राज्यामध्ये गुटखा बंदी असताना देखील अवैधपणे गुटख्याची विक्री करणाऱ्या लोकांना जरब बसावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने खटले दाखल करण्यात आले आहेत. मार्च अखेर पुणे जिल्ह्यात 48 खटले दाखल करण्यात आले आहेत. तर पुणे विभागामध्ये ३१९ खटले दाखल करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यांपैकी २३ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.

एमपीडीए कायद्यानुसार पुणे जिल्ह्यातील 8 खटले दाखल केले जाणार आहेत. तर सातारा जिल्ह्यातील -3, सांगली जिल्ह्यामधील-3,सोलापूर मधील-4, तर कोल्हापुर जिल्ह्यातील-5 अशी खटल्यांची संख्या आहे. त्यामुळे यापुढे गुटखा माफियांवर कायद्याच्या माध्यमातून कठोरातील कठोर कारवाई होणार हे निश्चीत.