एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे चंद्रपूर येथे उपकेंद्र : सुधीर मुनगंटीवार

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन
संपूर्णपणे सामाजिक दायित्व निधीतून चंद्रपूर येथे एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात यावे, कुठल्याही निधीच्या दायित्वाशिवाय येत असलेल्या या प्रस्तावास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. संपूर्णपणे सामाजिक दायित्व निधीचा उपयोग करून हे उपकेंद्र सुरु करावयाचे झाल्यास यासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव अभ्यासपूर्ण पद्धतीने टाटा ट्रस्ट, पेट्रोलियम कंपन्या, जेएनपीटी, बजाज, डब्ल्यू सी एल, यासारख्या मोठ्या कंपन्यांकडे सादर करून या उपकेंद्रासाठी 100 ते 125 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून केंद्र सरकारकडून या उपकेंद्रासाठी काही निधी मिळू शकतो का याचाही अभ्यास केला जावा. चंद्रपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा असून आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरचा हा जिल्हा आहे. येथील महिलांच्या विकासासाठी हे उपकेंद्र निर्माण होणे गरजेचे आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

या उपकेंद्रासाठी जागेची उपलब्धता करून दिली जाईल, असे सांगून ते म्हणाले, दरम्यानच्या काळात विद्यापीठाने महिलांसाठी या उपकेंद्राच्या माध्यमातून कोणते अभ्यासक्रम सुरु करता येतील याची निश्चिती करावी. उपकेंद्राचे कॅम्पस डिझाईन निश्चित करून टप्प्या टप्प्यात त्याचे काम हाती घेतले जावे. हे अभ्यासक्रम सुरु करतांना ते शिक्षण पायावर उभे करणारे असावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुशल मनुष्यबळाची गरज आणि त्याची उपलब्धता यातील दरी सांधण्याचा प्रयत्न होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.