कंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी कंगना राणावत हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडीओ न्यायालयात सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयानं आज कंगना (Kangana Ranaut) च्या वकिलांना दिले आहेत.

कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेनं कारवाई केल्यानंतर याविरोधात कंगनानं न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यावर सुनावणी सुरू आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं महापालिकेनं ही कारवाई केली असा दावा कंगनानं केला आहे.

“कंगना ट्विटच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांवर टीका करत होती. त्यातील एका ट्विटवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची तिखट प्रतिक्रिया आली. त्यांनी कगंनाला धडा शिकवायला हवा असं म्हटलं. हरामखोर असा शब्दही वापरला. महापालिकेनं कारवाईच्या हालचाली सुरू केल्या तेव्हाच हे सगळं घडलं. राऊत यांच्या माझ्या विरोधातील वक्तव्यानंतरच पालिकेचे अधिकारी बंगल्याची पाहणी करण्यासाठी आले” असा यक्तिवाद आज कंगनाच्या वकिलांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या वकिलांनी तो युक्तिवाद फेटाळला. वृत्तवाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये राऊत यांनी कुठेही याचिकादार कंगनाचं नाव घेतलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावर, राऊत यांनी कंगनाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरला नाही असं तुमचं म्हणणं आहे का असा सवाल न्यायालयानं केला असता त्यावर राऊतांच्या वकिलांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. अखेर न्यायालयानं राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ न्यायालयात सादर करा असे निर्देश कंगनाच्या वकिलांना दिले.

‘महापालिकेनं पुरेसा वेळ दिला नाही’

कारवाई करण्यापूर्वी किमान 15 दिवसांची नोटी द्यायला हवी असं मुंबई हायकोर्टानं पूर्वी काही निवाड्यांत स्पष्ट केलं आहे. तर सुप्रीम कोर्टानं संबंधित अनधिकृत बांधकामाच्या फोटोंसह किमान 7 दिवसांची नोटीस देण्याचा नियम घालून दिला आहे. तरीही पालिकेनं उत्तर देण्याची पुरेशी संधी न देता 24 तासांची नोटीस देऊन घाईघाईत तोडकामाची कारवाई केली याकडेही कंगनाच्या वकिलांनी लक्ष वेधलं