कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापणार्‍या तरुणाला बेड्या !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लोकांकडून हातउसने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एक सुशिक्षित तरुणाने यू ट्यूब व्हिडीओ पाहून चक्क नकली नोटा बनवल्या होत्या. मात्र, मुंबई पोलिसांनी सापळा रचून तरुणाला बेड्या घालत त्याच्याकडून 100 रुपयांच्या 896 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दीपक घुंगे असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दीपक घुंगे उच्चशिक्षित असून लोकांकडून घेतलेले कर्ज फेडणे त्याला शक्य होत नव्हते. लॉकडाऊनमुळे त्याला कुठे नोकरी मिळणेही अवघड झाले होते. त्यामुळे त्याने नकली नोटा बनवून कर्ज परत फेडण्याचा पर्याय निवडल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. दीपक बनावट नोटा घेऊन सीताराम मिल कंपाऊंड लोअर परळ इथे वितरित करण्यासाठी येणार अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून भारतीय चलनाच्या शंभर रुपयांचे 896 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. नोटा बनवण्यासाठी त्याने पुण्यालगत असलेल्या दौंड इथे एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला आणि लॅपटॉप, लेझर स्कॅनर प्रिंटर, लॅमिनेटर, अर्धवट छपाई झालेल्या नोटांचे कागद, हिरव्या रंगाचे फाईल, बंडल पेपर आणि इतर साहित्य जप्त केले आहे.