कर्तव्य बजावत असताना मृत झालेल्या वाहतूक पोलिसाला दिली कुत्र्याची उपमा

अशोक मोराळे

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
वाहतूक पोलीस हवालदार अनिल शालिग्राम शिसोदे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 211 वर कर्तव्य बजावत असताना एका ट्रक चालकाने त्यांना चिरडून ठार मारले होते. याची बातमी प्रकशीत करण्यात आली होती. त्या प्रकाशीत करण्यात आलेल्या पेजच्या खाली प्रतिक्रीयामध्ये एका महाभागाने त्या वाहतूक पोलिसाला कुत्र्याची उपमा देत अपमान केला आहे. तसेच पोलिसवाले एकच नाही तर रोजच असे दहा मरायला हवेत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लिहल्या आहेत. एकाप्रकारे या महाभागाने संपूर्ण पोलीस दलाचा अपमानच केला आहे.

खरंतर पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास बांधील असणारी व्यक्ती असते. पोलीस दलामध्ये असे काही बोटावर मोजण्या एवढे कर्मचारी अधिकारी भ्रष्टाचारी असतील ही मात्र सर्व पोलीस दलाला अपराध्याच्या एकाच कटघऱ्यात उभे करणे कितपत योग्य आहे ? पोलीस हा आपल्यापैकीच एक माणूस आहे हे आपण विसरत चाललो आहोत. आपण विसरत चाललो आहोत 26 /11 च्या वेळी ज्या पोलीस बांधवांनी आपल्या परिवारातील कोणाची ही पर्वा न करता तुमच्या सर्वांच्या रक्षणासाठी हसत हसत मरणाला जवळ केलं.

बाप आजारी आहे, आई आजारी आहे, मुलाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे काय करणार बंदोबस्त आहे हो सुट्ट्या बंद आहेत नाही जमनार, समाजातील लोकांना सुरक्षित जगता यावे यासाठी पोलीस आपलं खाजगी जीवन विसरुन जातो आहे. चोवीस तास बंदोबस्तात उभा राहणारा पोलीस आपण विसरतो आहोत का?

गुन्हेगार हा समाजातील एक घटक असतो म्हणून जर पोलिसांनी सर्व समाज गुन्हेगार आहे असे समजून आलेल्या प्रत्येक माणसाला फोडायला सुरूवात केली तर आपल्या सर्वांना कसे वाटेल ? पोलीस कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुकांचं समर्थन नाही एखादा दुसरा पोलीस कर्मचारी चुकत असेल म्हणून पोलिसांनी केलेल्या सर्व चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करुन एखादा पोलीस कर्मचारी मेल्यानंतर त्याच्यावर अशा अपमानस्पद प्रतिक्रिया देणं कितपत योग्य आहे. आज तो पोलीस कर्मचारी गेल्यानंतर त्याच्या घरच्या लोकांवर काय वेळ असेल याचा विचार आपण कधी करणार आहोत का नाही?

याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या वतीने पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले असून मयत शिसोदे व सर्व महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर शाब्दीक शिंतोडे उडविले असून अशा लोकांना तात्काळ आळा घालण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.