कर्तव्य बजावत असताना, वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

मोखाडा: पोलिसनामा ऑनलाईन
जव्हार एस टी आगारातील वाहक भालचंद्र महादेव घोटे ( 48 ) हे जव्हार – कसारा ह्या बसफेरी वर कार्यरत असताना, ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते मोखाड्यातील खोडाळा गावातील रहिवासी होते.

भालचंद्र घोटे हे आज जव्हार – कसारा या बसफेरी वर कार्यरत होते. मोखाडा – खोडाळा दरम्यान देवबांध घाटात बस जात असताना, त्यांना तीव्र ह्रदय विकाराचा झटका आला. त्यात गाडीतच ते कोसळले. त्यांना तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. घोटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तिन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष हरपल्याने घोटे कुटूंब पुरते खचले आहे.

घटनेची माहिती मिळताच, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य रघुनाथ पवार यांनी घोटे कुटुंबाचे सांत्वन केले आहे.