‘कसबा’त भाजपकडून कोण?

पुणे पोलिसनामा ऑनलाईन

कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपशी लढायला काँग्रेस पक्षात पाच जण तयार झाले आहेत. त्याच वेळी भाजपमध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत? कसबा मतदारसंघातून पाच वेळा विधानसभेवर गिरीश बापट निवडून आले आहेत. आगामी काळात बापट लोकसभा लढविणार की विधानसभा याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

लोकसभेसाठी भाजपमध्ये चारजण इच्छुक आहेत. त्यामध्ये बापट यांचे नांव प्रसारमाध्यमांमधून लिहीले जाते आणि बापट यांनी आजवर त्याचा इन्कार केलेला नाही. याचा अर्थ असा की भाजपचा लोकसभा उमेदवार घोषित होईपर्यंत बापट लढणार कुठून? याची चर्चा होत राहाणार आहे.

विधानसभेसाठी भाजपच्या अन्य इच्छुकांमध्ये नगरसेवक हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे माजी नगरसेवक अशोक येनपुरे, आणि धनंजय जाधव आहेत. मध्यंतरी वाढदिवसाच्या निमित्ताने रासने आणि घाटे यांनी शक्तीप्रदर्शनही केले. अलीकडे कसब्यातील इच्छुकांमध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांचीही नांवे घेतली जावू लागली आहेत. पण, या नावांचा संदर्भ लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी ‘जर-तर’नेच जोडला जातो. त्यामुळे भाजपमध्ये बापट की आणखी कोणी? याची उत्सुकता आहे.