कोयना धरणग्रस्तांचा सरकारच्या नावाने होळी करत शिमगा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

शंभर टक्के विकसनशील पुनर्वसनासाठी गत पाच दिवसापासून कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या कोयना धरणग्रस्ताच्या आंदोलनाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे. शासनाचा हे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांनी संताप व्यकत करून आंदोलन स्थळावरच होळी पेटवून शासनाच्या नावाने बोंबाबोंब करून शिमगा केला आहे.

60 वर्षापासून कोयना पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न आहेत.शासनाने हे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवून शंभर टक्के विकसनशील पुनर्वसन करावे या मागणीसाठी गत पाच दिवसापासून श्रमिक मूक्ती दलाच्या झेंड्याखाली कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पाच दिवसापासून कोयनानगर येथे चाललेले आंदोलन प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शासनाने हे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे चिडलेल्या आंदोलकांनी आंदोलन स्थळावरच धरणग्रस्ताचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होळी पेटवून शासनाच्या नावाने बोंबाबोंब करून शिमगा केला आहे.