कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारा निर्णय 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना दोन महिन्याच्या आत पर्यायी जमीन वाटप करण्यात यावे तसेच ठाणे व  पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना गावठाण व पर्यायी जमीन एकाच ठिकाणी देण्यात यावी,”असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.अधिकाधिक प्रकल्पग्रस्तांना महावितरणामध्ये नोकऱ्या देण्यासंदर्भात ऊर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय देणारे निर्णय घेतल्याबद्दल जनजागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव भांडारी यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत .

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.जनजागर प्रतिष्ठानने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या आहेत.त्याची दखल घेऊन महसूल मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय आजच्या बैठकीत जाहीर केले .

या बैठकीला महसूल उपसचिव राहुल कुलकर्णी , पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे ,ठाणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती तेलंग, साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती आरती भोसले,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गाडे ,उपस्थित होते आजच्या बैठकीला प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक माधव कुलकर्णी, सातारा जिल्हा  समन्वयक देवराज देशमुख ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक सेजलताई कदम,हरिश्चंद्र कदम,जगन्नाथ साळुंखे,नंदकुमार सुर्वे उपस्थित होते.