आंबेडकर, मेवाणीला अटक करून ब्रेनमॅपिंग करा : संभाजी भिडे

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन
कोरेगाव-भीमा येथील घटनेनंतर तीन जानेवारीला पुकारलेल्या बंदवेळी झालेल्या जातीय दंग्याला प्रकाश आंबेडकर कारणीभूत आहेत. आंबेडकरांसह जिग्नेश मेवाणी, उमर खलीद, माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुण्यातील एल्गार परिषदेत चिथावणी दिल्याने वढू बुद्रुक, कोरेगाव-भीमा येथे दंगल झाली. त्याचे सत्य बाहेर येण्यासाठी या सर्वांना अटक करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

भिडे म्हणाले, आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्रात सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. एल्गार परिषदेत नेत्यांनी भडकाऊ भाषणे केली. त्यामुळे सुनियोजित दंगल घडविण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. त्यांना राज्यात झालेल्या दंगलीला जबाबदार धरून त्यांना ताताडीने अटक करावी. तीन जानेवारीला पुकारलेल्या बंदवेळी झालेली नुकसान भरपाई शासनाने आंबेडकर आणि त्यांच्या टोळीकडूनच वसूल करावी. सरकारने ती भरण्याचा निर्णय घेऊ नये. यापूर्वी झालेल्या दंगलीत कोणत्याच सरकारने असा विचित्र निर्णय घेतला नव्हता असेही भिडे म्हणाले.

या घटनेला अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी यावर शासनाने काहीच का निवेदन केले नाही असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. कोरेगाव-भीमा येथील तसेच बंदवेळी झालेली तोडफोड याबाबतच्या तपासात गती का नाही याचाही खुलासा शासनाने करावा. या दोन्ही दंगलींना जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कडक शासन करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कोरेगाव-भीमा येथे गोविंद महाराज समाधीजवळ वादग्रस्त फलक कोणी लावला, त्यामागे त्यांचा काय हेतू होता याचीही सखोल चौकशी करण्यात यावी. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असल्याने राहुल फटांगडेचा निर्घृण खून करण्यात आला. त्याच्या मारेकर्‍यांना अद्याप का अटक केली नाही. त्याचीही सखोल चौकशी करून कारवाई करावी. पुण्यातील एल्गार परिषदेचा नक्षली चळवळीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील कोम्बींग ऑपरेशनमध्ये कोरेगाव-भीमाची भित्तीपत्रे, नक्षली कागदपत्रांसह चार नक्षलवादी सापडले. त्यांचा दंगलीशी असलेला संबंध सरकारने जाहीर करावा अशी मागणीही भिडे यांनी केली.

मोर्चाच्या परवानगीचा पुनर्विचार करावा
भिडे यांच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी 26 मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढून घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. जे घडलेच नाही त्यासाठी ठिय्या आंदोलन हाच खुळचटपणा आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असाच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे शासनाने त्यांच्या मोर्चाला दिलेल्या परवानगीचा पुनर्विचार करावा. मुळात त्यांचेच नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आमचा संशय आहे. त्याशिवाय दोन्ही दंगलींना तेच कारणीभूत आहेत. या दंगलीत झालेल्या 97 कोटी रूपयांची नुकसान भरपाई त्यांच्याकडूनच वसूल करावी असेही भिडे म्हणाले.