‘कोरोना’ला समूळ नष्ट करण्यासाठी पालिकेची जनचळवळ, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती !

पोलीसनामा ऑनलाइन : कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं माझे कुटुंब माझी जबाबदारी ही राज्यव्यापी मोहिम घराघरात राबवायला सुरुवात केली असून मुंबईत या मोहिमेसाठी जोरदार जनजागृती सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत 60 लाख परिपत्रकं, रस्त्यारस्त्यावर 735 मोठ्या होर्डिंग्जसह घोषवाक्ये, वर्तमानपत्रे, वृत्तावाहिन्या, रेडिओ यावर जाहिरातींसोबतच पालिकेच्या सोशल मीडियावर जोरदार जनजागृती केली जात आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराघरात 2 वेळा तपासणी करून कोरोनाला आळा घातला जाणार आहे.

‘एक वचन तीन नियम’वर भर

राज्य सरकारची ही मोहिम प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचावी यासाठी पालिकेनं मुंबईतील रस्त्यावर एक वचन तीन नियम – मास्क वापरा, हात धुवा, अंतर ठेवा ! अशी घोषवाक्ये असणारी मोठी आणि इंग्रजीमधील होर्डिंग्ज उभारली आहे. यात मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरण्याचे, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सोबतच घराबाहेर आणि घरात परतल्यानंतर वेळोवेळी हात धुवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. मराठी आणि इंग्रजीत 735 मोठी होर्डिंग्स लावली जाणार आहेत. यात वॉर्डरूमची माहिती देणारे 125 होर्डिंग्स आहेत तर एक वचन तीन नियम या घोषवाक्यासह मराठी आणि इंग्रजी स्वरूपात 30 लाख माहितीपत्रकं छापण्यात येणार आहेत. त्यातील 16 लाख 20 हजार प्रति छापून झाल्या असून त्यातील 4 लाख प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.

मुंबईकरांनी काळजी कशी घ्यावी तसेच वॉर्डरूमचे संपर्क क्रमांक असे पाठोपाठ स्वरूपात असलेल्या रंगीत माहितीपत्रकांच्या 30 लाख प्रती छापण्यात येत आहेत. यातील 21 लाख प्रती छापल्या असून त्यातील 14 लाख माहितीपत्रकं लोकांपर्यंत पोहोचली आहेत. मुंबईतील 2575 बस थांब्यांवर जाहिराती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. मुंबईतील 4 रेडिओ वाहिन्यांवरून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या जिंगल्स स्वरूपातील जाहिराती 9 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत.

विविध मराठी वृत्तवाहिन्यांवर तळटीप संदेश (स्क्रोल्स) च्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मुंबईकरांशी थेट संवाद साधण्यासाठी पालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले तसेच पालिकेचे अतिरीक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकणी यांच्या मुलाखती वृत्तवाहिन्या, रेडिओ वाहिन्यांवर प्रसारीत करण्यात आल्या आहेत.

जनजागृतीसाठी मराठी वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या सोशल मीडियावरूनही जनजागृती मोहिम करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून या मोहिमेसाटी 10 कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी पालिकेनं पर्यावरणमंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती केली आहे.