मानवी तस्करी प्रकरणी गायक दलेर मेंहदीला दोन वर्ष कारावास

पटियाला: वृत्तसंस्था
बाहुबली शीर्षक गीत गायक दलेर मेहंदीला मानवी तस्करी प्रकरणी दोषी धरत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी बख्शीस सिंह यांनी दोन्ही मेहंदी बंधूंविरोधात तक्रार दाखल केली होती. पंजाबमधील पटियाला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केली. हे प्रकरण 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरला असून त्याच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी पहिला गुन्हा 2003 मध्ये अमेरिकेत दाखल करण्यात आला होता. मानव तस्करीद्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेतच पाठवण्यात आल्याचे समोर आले होते. दलेर व त्याचा भाऊ शमशेर यांनी दहा लोकांना परदेशात ठेवल्याचा आरोप आहे.दलेर मेहंदी आपल्या म्युझिक टीमसोबत लोकांना परदेशात पाठवत असे आणि त्याबदल्यात मोठी रक्कम मिळवायचा परत परदेशात गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भारतातून नेलेल्या व्यक्तींना तो तिकडेच सोडून येत असे, असा अारोप मेहंदीवर आहे.