‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचं कॅन्सरनं निधन

पोलीसनामा ऑनलाइन – ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या सुप्रसिद्ध प्रार्थना गीताचे गीतकार अभिलाष यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कॅन्सरशी झुंज सुरु होती. अखेर रविवारी गीतकार अभिलाष रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या लोकप्रिय गीतशिवाय सांझ भाई घर आजा, आज की रात न जाना, वो जो खत मुहब्बत में, तुम्हारी याद सागर में, संसार एक नदी या, तेरे बिन सुरा मेरे मन का मंदिर अशी त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली होती. सुमारे चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाणी लिहली. तसेच चित्रपट व मालिकांचेही लेखन केले. पटकथा-संवाद लेखक म्हणूनही त्यांचे अमूल्य योगदान राहिले. अदालत, धूप छाँव, दुनिया रंग रंगिली, अनुभव, संसार, चित्रहार, रंगोली अशा अनेक लोकप्रिय शोचे लेखन त्यांनी केले. पटकथा लेखन आणि गीत लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

दरम्यान, अभिलाष हे दीर्घकाळापासुन यकृताच्या कॅन्सरशी झुंज देत होते. मार्च महिन्यात त्यांच्या पोटातील एका ट्युमरचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. तसेच आर्थिक कारणांमुळे त्यांच्यावर उपचार करण्यास अडचणी येत होत्या. त्यांच्या पत्नी नीरा अभिलाष यांनी इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी (आयपीआरएस) कडे तातडीने आर्थिक मदत मागितीला होती. काल रात्री गोरेगाव पूर्वच्या शिवधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.