गुन्हेगारांचे एन्काऊंटर बंद होणार नाहीत : योगी आदित्यनाथ

लखनौ : ‘गुन्हेगारांविषयीही सहानुभुती असणारे काही जण आहेत, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे’ अशा शब्दांत टीका करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘गुन्हेगारांविरुद्धची कडक कारवाई आणि एन्काऊंटर बंद होणार नाही’ असे स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमधील विधान परिषदेत शून्य प्रहरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केले.

उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी विश्‍वावर वचक बसविण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये 1200 चकमकी झाल्या असून त्यात 40 अट्टल गुन्हेगार ठार झाले आहेत. ‘ही कारवाई अशीच सुरू राहील. गुन्हेगारांना आश्रय कोण देत होतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे’ अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले.

विधान परिषदेचे अध्यक्ष रमेश यादव यांनी एन्काऊंटरच्या दोन प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यासंदर्भातील एका प्रश्‍नावर योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी उत्तर दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, “गुन्हेगारांविषयी काही जणांना सहानुभूती आहे. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. नोएडामध्ये 3 फेब्रुवारी रोजी जितेंद्र यादवला पोलिसांची गोळी लागली होती. पण ही कारवाई म्हणजे एन्काऊंटर नव्हते.”

यासंदर्भात भाजपचे आमदार देवेंद्र प्रताप सिंह यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या काही मुद्यांची दखल अध्यक्षांनी घ्यावी, अशी विनंतीही आदित्यनाथ यांनी केली. या औचित्याच्या मुद्यांवर अध्यक्ष यादव यांनी निर्णय राखून ठेवला.