153 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण : पुण्यातील ‘त्या’ आमदाराच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेचा छापा, 4 अलिशान कार जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या चार कार जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे पालिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पथकांनी या महागड्या कार जप्त केल्या असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. 153 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात सध्या ते कारागृहात आहेत.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात विधान परिषदेतील आमदार व बँकेचे अध्यक्ष अनिल शिवाजीराव भोसले (वय ५५, रा. बाणेर रस्ता), संचालक सूर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरू पार्क, एरंडवणे), मुख्य अधिकारी तानाजी दत्तू पडवळ (वय ५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), बँकेचे मुख्य हिशेब तपासणीस शैलेश संपतराव भोसले (वय ४७, नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याबाबत योगेश लकडे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. 81 कोटींचा गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांवर गुन्हा करत अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक केली होती. तपासात या गुन्ह्याची व्यप्ती वाढली. त्यात 81 वरून 153 कोटींवर गैरव्यवहाराचा आकडा गेला होता. बँकेतील आर्थिक गैरव्यवहार निदर्शनास आल्यानंतर रिझव्र्ह बँकेने ६ मे २०१९ रोजी आदेश दिले होते.

अनिल भोसले बँकेचे अध्यक्ष, संचालक असताना जाधव संचालक होते. पडवळ हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले हे बँकेचे मुख्य हिशोब तपासणीस होते. ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने लेखापरिक्षक लकडे यांनी बँकेच्या रोख शिल्लक रकमेबाबत पडताळणी करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार लेखा परीक्षण करून गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर या गुन्ह्याचा तपास सुरू असून, त्यात आता पुणे पोलिसांनी 4 महागड्या कार जप्त केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी या कार जप्त केल्या असून गाड्याची किंमत 1 कोटीहून अधिक आहे.