‘घातक’ तात्या पटेल अखेर गजाआड

ठाणे: पोलीसनामा ऑनलाईन

त्याच्या दहशतीचा दरारा असा होता की स्थानिक नेते आणि गुंड देखील त्याला सलामी ठोकतं असतं, मोस्ट वांटेड असूनही तात्या खुलेआम जनता दरबार भरवत असे. मीरा- भाईंदर शहरातील कुख्यात डॉन तात्या पटेलला अखेर ठाणे ग्रामीणच्या काशिमीरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंधेरीच्या यारी रोड येथून अटक केली आहे. गेल्या दीड वर्षापासून तात्या पोलिसांना चकवा देत होता. पन्नास पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या तात्या पटेलवर भाईंदरच्या एका महिलेला जिवंत जाळण्याच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणात मोक्का लागला होता. तेव्हापासून तात्या फरार होता.

तात्या पटेलवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये अपहरण, दंगली घडवणे, सरकारी कामांमध्ये अडथळा आणणे, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे, धाक-दपटशाही करुन जागा-जमीन बळकावणे असे 50 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाईंदरच्या एका जमिनीच्या वादामध्ये तात्याने एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्याला मोक्का लागला होता. याच प्रकरणात तात्या गेल्या दीड वर्षांपासून फरार होता.

मीरा- भाईंदरमध्ये पटेल कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कुटूंबात सात भाऊ आणि एक बहीण असा परिवार होता. त्यातील दोन भावांचा गॅंगवारमध्ये मृत्यू झाला असून सर्वच भावांवर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर तात्याच्या बहिणीला लेडी डॉन या कुप्रसिद्ध नावाने ओळखले जात होते. तसेच तात्या पटेल याच्यावर मोक्क्या अंतर्गत कारवाई होण्याअगोदर आपल्याच घरात बॉडीगार्ड सुल्ताना शेक याची हत्या केल्याचा गुन्हा ही दाखल होता. या गुन्ह्यात देखील तो पाच वर्ष फरार होता. 1996 साली प्रदर्शित झालेला ‘घातक’ सिनेमा तात्या पटेलच्या आयुष्यावर आधारित होता. ज्येष्ठ अभिनेते डैनी डेन्जोपा यांनी या सिनेमात ‘तात्या’ची भूमिका साकारली होती.