चांदणी चौकात होणार शिवसृष्टी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : “कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचे रेल्वेचे यार्ड करण्यात येईल. लगतच्या स.न.99 व 100 मधील बीडीपी क्षेत्रात शिवसृष्टी करूयात. यासाठी आरक्षण बदल व जागा ताब्यात घेण्यासाठी येणारा खर्च याचा विस्तृत आराखडा तयार करावा असा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच शिवसृष्टीच्या मुद्द्यावरून नगरसेवक दीपक मानकर यांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका बैठकीत केले.
महापालिकेने कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु महामेट्रोने या जागेवर मेट्रो डेपोचे नियोजन केले. महापालिकेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी आणि या जागेवर शिवसृष्टी उभारावी यासाठी नगरसेवक दीपक मानकर आणि कोथरूड येथील नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मुंबई येथील सह्याद्री भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

महापौर म्हणाल्या, मेट्रो यार्डचे काम त्याच ठिकाणी होईल. तांत्रिक नियोजन करूनच आराखडा तयार करण्यात आला आहे. हे काम थांबवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी विरोधकांना केले. या जागेलगत बिडीपीचे क्षेत्र आहे. यापैकी 28 एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्याचे नियोजन करू. यासाठी आरक्षण बदल करण्यासोबत भूसंपादनासाठी येणारा खर्च याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिला.”

मेट्रोचे अधिकारी तसेच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी यावेळी अनुक्रमे मेट्रो व शिवसृष्टी प्रकल्पाचे सादरीकरण केले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यावेळी उपस्थित होते.

बीडीपीचा निर्णय येत्या 15 दिवसात
”महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावातील बिडीपीमध्ये बांधकामाला परवानगी देण्याचा निर्णय 2005 पासून प्रलंबित आहे. यासंदर्भात पुढील 15 -20 दिवसात पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल,”असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.