चाकूने वार करुन 22 वर्षीय तरुणीची हत्या

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईन

येथील 22 वर्षीय तरुणीवर चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना राज्याच्या उपराजधानीत घडली आहे. पारशिवणी तालुक्यातील शिंगोरी येथील बस स्थानकाजवळ ही खळबळजनक घटना घडली.

रत्नमाला राजकुमार रांगणकर असे मृत तरुणीचे नाव आहे. आज सकाळी रत्नमाला तिच्या आईसोबत स्कूटरवरुन जात असताना, बाईकवरुन आलेल्या आरोपीने कट मारुन तिला खाली पाडले. त्यानंतर आरोपीने रत्नमालावर चाकूचे पाच ते सहा वार केले. यात रत्नमाला गंभीररित्या जखमी झाली. या घटनेनंतर रत्नमालाला तातडीने उपचारासाठी कामठी येतील आशा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान रत्नमालाचा मृत्यू झाला.

मंगल उर्फ साजन बागडे (वय 25 वर्ष ) असे आरोपीचे नाव आहे. रत्नमाला रांगणकर वेस्टर्न कोल फिल्ड या सरकारी कोळसा कंपनीत कार्यरत होती. तिच्या हत्येचं कारण अस्पष्ट असले, तरी आरोपी मंगल बागडे हा रत्नामालाच्या ओळखीतला होता.आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सुरु असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.