चाहता उभारणार श्रीदेवी यांचे मंदीर

उत्तर प्रदेश – अभिनेत्री श्रीदेवी यांच्या धक्कादायक मृत्युच्या बातमीतून त्यांचे चाहते अजूनही सावरु शकलेले नाहीत. आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या आठवणी अजरामर ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गंगाराम या श्रीदेवीच्या चाहत्याने त्यांचे मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हरदोई येथे बनणाऱ्या या मंदिरामध्ये श्रीदेवी यांची मूर्ती प्रस्थापित करुन त्यांची रोज पूजा करणार असल्याचे गंगाराम यांचे म्हणणे आहे.

श्रीदेवी यांची प्रतिमा स्थापित करण्याचे काम देखील गंगाराम यांनी सुरु केले आहे. या कामामध्ये ग्रामस्थ सुद्धा गंगारामची मदत करीत आहेत. एवढेच नाही तर श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर गंगारामने मुंडन देखील केले आहे. तर रोज श्रीदेवींच्या फोटोला अगरबत्ती व फुले वाहून ते पूजा करीत आहेत.

श्रीदेवी यांचे चित्रपट पहायला गंगारामला खूप आवडायचे. त्यामुळे श्रीदेवींचे सर्व चित्रपट त्यांनी पाहिले आहेत. काही चित्रपट तर त्यांनी १०० पेक्षा अधिकवेळा पाहिले आहेत. आणि म्हणूनच श्रीदेवींचा जबरा फॅन असलेल्या गंगाराम यांनी त्यांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.